मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. त्यातच आता राज्यातील स्थानिक प्रश्न, समीकरणांचा विचार करुन पक्षाकडून निर्णय घेतले जातात असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.
संदीप देशपांडे बीबीसी मराठी वृत्तवाहिनीला मुलाखतीत भाजपा आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर म्हणाले की, सध्या कोणत्याच निवडणुका नाही आहेत की मनसे आणि भाजपा युतीबाबत चर्चा व्हाव्यात. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निडणुकीत 'मोदीमुक्त भारत' असा नारा दिला होता. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे मनसे पक्षाच्या झेंड्याच्या रंगामध्ये बदल करण्यासंदर्भात अजून कोणताच निर्णय झाला नसून जर बदल करायचा असल्यास राज ठाकरे निर्णय घेतील असं देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मनसेचे बाळा नांदगावकर यांनी कोणासोबत राजकीय समीकरणं होणार मला माहिती नसून भविष्यात कोणासोबत जायचं, न जायचं हा निर्णय राज ठाकरे घेतली असं सांगितले होते. तसेच राजकारणात कधीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो असं सांगत भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले होते.
बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती?
दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.