मुंबई - दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा द काश्मीर फाईल्स चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 150 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटामुळे वादही निर्माण झाले आहेत. द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कौतूक केले. त्यानंतर, भाजप नेत्यांनी, भाजपशासित राज्यांनी या चित्रपटाला प्रमोट केले. काहींनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला. त्यामुळे, या चित्रपटाबद्दल अनेकांची उत्सुकता वाढली. आता, मनसेनं हा चित्रपट फुकट दाखवण्यास सुरुवात केली आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. माहिम विधानसभा आयोजित हा चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला आहे. 24 मार्च रोजी सायंकाळी 7.15 वाजता एल.जे. रोडवरील सिटी लाईट सिनेमागृहात हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तसेच, तिकीट मिळविण्यासाठी संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, असेही त्यांनी म्हटले.
केंद्रानेच करमुक्त करावा - अजित पवार
'द काश्मीर फाईल्स' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राज्याने याआधी मिशन मंगल, तानाजी, पानिपत असे सिनेमे करमुक्त केले होते. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वक्तव्यामध्ये केला होता. हा सिनेमा केंद्रानेच करमुक्त करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. फक्त महाराष्ट्रात करमुक्त, असा भेदभाव कशाला ठेवायचा. केंद्राने जर या चित्रपटावरील GST रद्द केला तर तो निर्णय संपूर्ण देशालाच लागू होईल. त्यामुळे अगदी जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यत सर्वत्रच हा चित्रपट करमुक्त होईल, अशी भाजपा नेत्यांच्या मागणीवर अजित पवारांनी गुगली टाकली.