Sandeep Deshpande: "त्यावेळची वसंतसेना आणि आताची शरदसेना", संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:21 PM2022-04-12T19:21:02+5:302022-04-12T19:42:18+5:30
Sandeep Deshpande:"डोळा एकाला मारला, प्रेम दुसऱ्याबरोबर, लग्न तिसऱ्याबरोबर आणि हनीमुन चौथ्याबरोबर, अशी अवस्था झालीये आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता."
ठाणे: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उत्तरसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. "2 एप्रिलला गुढीपाडव्यावर राज ठाकरेंची न भूतो न भविष्यती सभा झाली. दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा झाली. अख्या राज्याचे लक्ष सभेकडे होते. यात राज साहेबांनी आपले विचार मांडले. आजची सभा या लोकांनी उपस्थित केलेले प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयोजित केली आहे," असे देशपांडे म्हणाले.
"त्यावेळची वसंतसेना आणि आताची शरदसेना"
"राज ठाकरेंनी त्या दिवशी मशीनगनप्रमाणे फायरिंग केली, यात अनेकजण घायाळ झाले. घायाळ झालेले लोकं इतिहास माहित नाही अन् काहीही बोलू लागले. मनसे भाजपची बी टीम म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले, संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही. शिवसेनेचा इतिहास तपासून घ्या. याच सेनेला वसंतसेना म्हटले जायचे. का? तर वसंत दादा पाटलांनी मुंबई वेगळी करू असे म्हूणत शिवसेनेला पुनर्जीवन दिले. त्यावेळची वसंतसेना आणि आताची शरद सेना झालीये."
"ढ सेनेने आम्हाला शिकवू नये"
"डोळा एकाला मारला, प्रेम दुसऱ्याबरोबर, लग्न तिसऱ्याबरोबर आणि हनीमुन चौथ्याबरोबर, अशी अवस्था झालीये आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. राज साहेबांनी जी भूमिका घेतलीये, ती ठामच घेतलीये. त्यासाठी आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही निवडणुकीपूर्वी युती एकाबरोबर आणि नंतर दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसलो नाही. अशा ढ लोकांनी भरलेल्या ढ सेनेने आम्हाला शिकवू नये."
संबंधित बातमी- "तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवायला निघालात", संदीप देशपांडे यांचा घणाघात