MNS Sandeep Deshpande News: मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर विरोधक टीका करत असताना, राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. यानंतर ठाण्यातील सभेला जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर आता पुन्हा क्रिया केली, तर प्रतिक्रिया येणारच, आरे ला का रे करणारच, या शब्दांत मनसेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी झालेल्या घटनांबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले. मीडियाशी बोलताना संदीप देशपांडे यांनी थेट इशारा दिला आहे. तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत. तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत. मराठवाड्यात जे झाले ते आणि जो प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. हे कोणालाही आवडले नाही. आपणही काचेच्या घरात राहतो. आपणही दौऱ्यावर जातो, सभा घेतो, याचे भान प्रत्येकाला असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने असेच करायचे ठरवले तर महाराष्ट्रात काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करावा, असा सल्ला संदीप देशपांडे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या आडून राज ठाकरेंवर वार कराल तर...
मराठा आंदोलकांच्या आडून राजसाहेबांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर झाले ते क्रियेला प्रतिक्रिया होती. पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या गाडीवर हल्ला केला तेव्हा ही संस्कृती कुठे गेली होती, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. तसेच राज ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता प्रतिक्रिया मिळाल्यानंतर पुन्हा सारवासारव करु नये, अशी टीका संदीप देशपांडे यांनी दिली.
दरम्यान, एखादी गोष्ट सुरुवात करताना विचार करायचा असतो, पुढे त्याचा काय परिणाम होऊ शकतात. दुसऱ्याने काही केल्यानंतर मग शहाणपणा शिकवायला जायचे नसते, असे संदीप देशपांडे म्हणाले. ठाण्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चढवलेल्या हल्ल्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणही फेकण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी गडकरी रंगायतन येथील आपल्या भाषणात मनसैनिकांच्या या कृतीला प्रत्युत्तर दिले नव्हते. राज ठाकरे यांच्यासंदर्भातही कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यानंतर आता मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.