BMC Election 2022: “कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही”; मनसेचा सेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:38 PM2022-02-02T15:38:40+5:302022-02-02T15:39:53+5:30
BMC Election 2022: कोरोना काळात मुंबईकरांना खूप त्रास झाला. तेव्हा सत्ताधारी शिवसेना मदतीसाठी पुढे आली नाही, अशी टीका मनसेने केली आहे.
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका (BMC Election 2022) निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, सर्वच पक्ष सक्रीय होऊन मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेवरून भाजप आणि मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन युतीचा विचार न करता कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही, असा टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या काळात लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे लोकं शिवसेनेवर नाराज आहेत. लोकांची मानसिकता शिवसेनेबरोबर जाण्याची नाही. त्यामुळे प्रभाग रचना बदलली असली तरी लोकांची नाराजी बदलू शकत नाही, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी शिवसेना त्यांच्या मदतीसाठी पुढे आली नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्यातरी स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले आहेत. कार्यकर्त्यांनी युतीच्या चर्चेत पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या तरी आम्ही स्वतंत्र लढणार आहे. कोरोना काळात मुंबईतील लोकांना खूप त्रास झाला. यावेळी सत्ताधारी शिवसेना त्यांच्या मदतीसाठी पुढे आली नाही. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत, असा दावाही देशपांडे यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुंबईसह १५ महानगरपालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरु झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मनसेने इंजिनाची दिशा बदलली, नंतर झेंडा बदलून हिंदुत्ववादाच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपबरोबर युतीची चर्चाही सुरू झाली. परंतु, भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे निवडणुकीत कोणती रणनीती आखणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याची चर्चा आहे.