मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या निवडणुकीतील कार्यपद्धतीने प्रभावित झाल्यामुळे मी त्यांची भेट घेतल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आक्रमक भाषण करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. साताऱ्यातील पावसात सभा घेतल्याने राज्यभरातून शरद पवारांचे कौतुक करण्यात येत होते. संदीप देशपांडे देखील शरद पवारांच्या या कार्यपद्धतीने प्रभावित झाल्यामुळे आज (बुधवारी) शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुढील आठवड्यात शरद पवार मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे समजते आहे.
संदीप देशपांडे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. शिवसेनेचे विद्यामान आमदार सदा सरवणकर यांनी 18 हजार 647 अशा मतदिक्याने संदीप देशपांडे यांना परभूत केले होते. माहिम आणि दादर परिसरात मनसेने जोरदार प्रचार केला होता. संदीप देशपांडे 42 हजार 690 मतं मिळवत दुसऱ्या स्थानावर, तर काँग्रेस उमेदवार प्रविण नाईक तिसऱ्या क्रमांकावर होते. माहीममध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे विजयाचे गणित बिघडल्याचा दावा देशपांडेंनी केला आहे.