मुंबई : प्रशांत मोरेचा २-० असा धुव्वा उडवून, अनुभवी संदीप देवरुखकरने पाचव्या कार्याध्यक्ष कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. दुसऱ्या बाजूला महिला एकेरीत अव्वल मानांकित आयेशा महम्मदने आणि कुमार एकेरीत अव्वल दीपक मारु यांनी आपापल्या गटात विजेतेपदाला गवसणी घातली.मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने पार पडलेली कार्याध्यक्ष चषक स्पर्धा नायगावच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात पार पडली. पुरुषांच्या अंतिम फेरीत ओएनजीसी संघाच्या द्वितीय मानांकित संदीपने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना रिझर्व्ह बँक संघाच्या प्रशांत मोरेचे आव्हान सहजपणे परतवले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सलग दोन गेम जिंकताना संदीपने २५-१८, २५-१७ अशी सहज बाजी मारत, विजेतेपदावर आपले नाव कोरले.महिला गटात जैन इरिगेशनच्या आयेशा विरुद्ध आयुर्विमा महामंडळाच्या तिसऱ्या मानांकित शिल्पा पळणीकर यांच्यातील अंतिम सामना चुरशीचा ठरला. यावेळी विजय मिळवताना आयेशा मोठी कसोटी लागली. पहिल्या गेम केवळ एका गुणाने जिंकल्यानंतर आयेशाने यानंतर शिल्पाला कोणतीही संधी न देता, आक्रमक खेळाच्या जोरावर १७-१६, १९-१२ असा दणदणीत विजय मिळवला.कुमार एकेरी गटात गतविजेत्या दीपक मारुने आपले विजेतेपद कायम राखले. मात्र, यासाठी त्याला दुसऱ्या मानांकित सिद्धांत वाडवलकर विरुध्द झुंजावे लागले. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केलेल्या दीपकला सिध्दांतने कडवी टक्कर दिली. यावेळी त्याने दुसरा गेम जिंकून सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. मात्र, कसलेल्या दीपकने आपला सर्व अनुभव पणास लावताना सिध्दांतचा २२-१५, १२-१६, २५-९ असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा या गटाचे विजेतेपद पटकावले. (क्रीडा प्रतिनिधी )
संदीप देवरुखकरचे जेतेपद
By admin | Published: November 10, 2015 2:00 AM