Join us

Maharashtra Government: 'आमदारसाहेब म्हणू नका', पहिल्या शपथविधीनंतर संदीप क्षीरसागर भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 3:26 PM

Maharashtra News: विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ दिली.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्याला पूर्णविराम मिळाल्यानंतर 14 व्या विधानसभेचं कामकाज आजपासून सुरु झालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश दिल्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून सभागृहात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीनं कामाला सुरुवात झाली. यावेळी, पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेणारे युवक आमदार भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ दिली. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही. तर, कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून कालच शपथ घेतली होती. यंदाच्या 14 व्या विधानसभेत अनेक नवयुवक आमदार म्हणून पोहोचले आहेत. त्यामध्ये, आदित्य ठाकरे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर हेही आहेत. या तिघांनीही आपले वेगळेपण आज विधानभवनात सिद्ध केलंय. रोहित यांनी शपथ घेतेवेळी आईचे नाव घेतले, तर आदित्य यांनी शपथविधीनंतर माजी मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणीवीस यांच्याकडे जाऊन हातमिळवणी केली. तसेच, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हेही भारावल्याचे पाहायला मिळाले. संदीप यांनी विधानभवनातून बाहेर येताना, कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. 

''माझ्या बीड विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादामुळे, प्रेमामुळे आज लोकशाहीच्या मंदिरात मला प्रवेश करता आला. विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर मला अभिनंदनाचे अनेक शुभेच्छा विविध प्रकारे, विविध माध्यमातून आल्या. माझे अनेक सहकारी मला आमदार साहेब म्हणू लागले. मला माझ्या सहकाऱ्यांना सांगायचे आहे, की मला आमदार साहेब म्हणू नका मी कालही तुमचा भैय्या होतो आणि आजही तुमचा भैय्याच आहे. आमदारकी ही आपल्या मतदारसंघातील नागरिकांचा सेवक म्हणून विधिमंडळात आपले प्रश्न मांडण्यासाठी, विकासाचे कामे करण्यासाठी आहे. 

मी आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानतो'', अशी फेसबुक पोस्ट संदीप क्षीरसागर यांनी शेअर केली आहे. त्यामुळे संदीप हे आपल्या पहिल्या शपथविधीनंतर भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. 

टॅग्स :संदीप क्षीरसागरआमदारबीडबीडराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019