Join us

Sandeep Pathak: 'आप'ल्याला ह्यात ओढू नका, मराठमोळ्या अभिनेत्याची हात जोडून विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 4:20 PM

महाराष्ट्रातील मराठमोळ्या अभिनेत्याशी साधर्म्य असलेले आहे. त्यामुळे, संदीप पाठक यांचे नाव झळकताच ट्विटर अभिनेताही ट्रेंड झाला आहे. 

मुंबई - पंजाब विधानसभा निवडणुकीत(Punjab Assembly elections)  प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर आम आदमी पार्टीने (AAP)  राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Elections) तयारी सुरू केली आहे. पंजाबच्या 5 राज्यसभाखासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे, नव्या 5 चेहऱ्यांसह आपने नावांची घोषणा केली आहे. त्यातील एक नाव हे महाराष्ट्रातील मराठमोळ्या अभिनेत्याशी साधर्म्य असलेले आहे. त्यामुळे, संदीप पाठक यांचे नाव झळकताच ट्विटर अभिनेताही ट्रेंड झाला आहे. 

राज्यसभेच्या पाच जागांसाठी आपने क्रिकेटर हरभजन सिंग, आपचे दिल्लीतील आमदार राघव चढ्ढा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे चांचलर अशोक मित्तल, आपचे 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे डॉ. संदीप पाठक आणि उद्योगपती संजीव अरोरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. या 5 पैकी संदीप पाठक हे महाराष्ट्रातील अभिनेत्याचंही नाव आहे. त्यामुळे, गुगलवर आणि सोशल मीडियावर सर्च केल्यानंतर नेत्याऐवजी अभिनेताच ट्रेंड झाला. विशेष म्हणजे काही माध्यमांनीही अभिनेता संदीप पाठक यांचा फोटो बातमीसाठी वापरला. त्यामुळे, अभिनेता संदीप पाठक यांनी स्वत: ट्विट करत, तो मी नव्हेच.. अशी माहिती दिली. 

तो मी नव्हेच, आपचे डॅा. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल्सवर माझे फोटो वापरत आहेत. “आप”ल्याला ह्यात ओढू नका.. असे मिश्कील ट्विट अभिनेता संदीप पाठक यांनी केले आहे. 

कोण आहेत संदीप आपचे पाठक

हरभजन सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या राजकारणात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर, पंजाब विधानसभेत मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू होती. संदीप पाठक यांना आपचे चाणक्य म्हणून ओळखले जाते. पंजाबमध्ये पक्षाच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता. सलग तीन वर्षे पंजाबमध्ये राहून त्यांनी बूथ स्तरापर्यंत संघटना उभारली आहे. ते आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जवळचे मानले जातात.  

टॅग्स :आपखासदारराज्यसभाट्विटरव्हायरल फोटोज्