Join us  

काँग्रेसचे संदीप सावंत शिवसेनेच्या वाटेवर

By admin | Published: August 17, 2016 10:10 PM

मातोश्रीवर शनिवारी पक्षप्रवेश

चिपळूण : इंदिरा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व राणे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांचा शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. शनिवार, २० रोजी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असणारे व राणे कुटुंबीयांसाठी छातीचा कोट करणारे संदीप सावंत हे रत्नागिरी येथील मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहिले नव्हते. याचा राग मनात धरुन माजी खासदार नीलेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप संदीप सावंत यांनी केला. त्यामुळे नीलेश राणे यांना अटक करण्यात आली.दरम्यानच्या काळात सावंत यांनी काँग्रेस तालुकाध्यक्षपद व पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सावंत हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशी सातत्याने चर्चा होती. रक्षाबंधनाच्या दिवशी ते शिवबंधानात अडकणार, असे वृत्त होते. सावंत यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय पक्का असून, शनिवारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.महामार्गावर होणारे लहान - मोठे अपघात असोत किंवा रुग्णाला लागणारे रक्त असो ते तत्काळ उपलब्ध करुन सावंत हे रुग्णांचे प्राण वाचवतात. सामाजिक कार्यात सावंत यांचे योगदान आहे. राणे यांच्याबरोबर काडीमोड घेतल्यानंतर सावंत शनिवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत काही प्रमुख सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. (प्रतिनिधी)