Join us

साने गुरुजी म्हणजे महाराष्ट्राचा अलौकिक सांस्कृतिक वारसा: डॉ.भालचंद्र मुणगेकर  

By मनोहर कुंभेजकर | Published: June 14, 2024 6:54 PM

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि साने गुरुजी बालविकास मंदिर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रा. सुरेन्द्र गावस्कर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मनोहर कुंभेजकर, मुंबई- '' खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हा मानवतेचा महामंत्र साने गुरूजींनी आपल्याला दिला. तर बलसागर भारत होवो, आता उठवू सारे रान या गीतांमधून देशभक्ती, आत्मसन्मान शिकविला. पण अलीकडे परिस्थिती बिकट होत चालली आहे. आजच्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये साने गुरुजी पोचविण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो आहोत. सध्या साने गुरूजींच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू आहे. या निमित्ताने प्रभावी असलेल्या सिनेमा या माध्यमाचा वापर करून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनीना, युवक- युवतीना ' श्यामची आई ' हा राष्ट्पती सुवर्ण पदक विजेता सिनेमा सर्वत्र दाखवण्यात यावा. साने गुरुजी म्हणजे महाराष्ट्राचा अलौकिक असा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जोपासण्याच्या दृष्टीने ज्या ज्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येतील, त्या त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू या असे भावपूर्ण व गंभीर उद्गार जेष्ठ अर्थतज्ञ,माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पूज्य साने गुरूजींच्या ७४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काढले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि साने गुरुजी बालविकास मंदिर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रा. सुरेन्द्र गावस्कर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  समारंभाच्या प्रारंभी संस्थेचे कार्यशील कार्यकर्ते प्रसाद महाडीक व सुनीता गोळे यांनी पूज्य साने गुरूजींची ' खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना सादर केली. 'बालविकास मंदिर' मासिकाचे संपादक  जीवन यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सन्माननीय वक्त्यांचा परिचय करून दिला व त्यांचे स्वागत केले.

'आजचा श्याम घडतांना ' या विषयावर ज्येष्ठ बालसाहित्यिक  एकनाथ आव्हाड यांचे श्रवणीय व्याख्यान झाले. तर साने गुरुजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले, साने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी, ' साने गुरुजी  बालविकास मंदिर' चे अध्यक्ष श्री. यशवंतराव ब क्षीरसागर (वय वर्षे - ९४ ) यांनी पूज्य साने गुरुजींच्या अनेक ह्रदय आठवणी सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या ओघवत्या वाणीने त्यांनी, साने गुरुजींच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडविले. यावेळी प्राचार्य विनायक क्षीरसागर यांनी स्वामी अखंडानंद सरस्वतीजींच्या मूळ हिंदी पुस्तकावरून मराठीत अनुवाद केलेल्या ' इश्वर दर्शन ' या पुस्तकाचे, रविकुमार पौडवाल यांच्या   ' शुभ चिंतन ' या कवितासंग्रहाचे व ' बालविकास मंदिर ' मासिकाच्या ' साने गुरुजी स्मृतिदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. 

समारंभात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, ललीतलोचन क्षीरसागर,रविकुमार पौडवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  प्रसाद महाडीक यांनी सूत्र संचालन केले आणि  मान्यवर व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. समारंभाला  विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्वश्री रवींद्र गावडे, नरेश सावंत, प्रशांत खोपकर, चंद्रकांत सोगले, अरविंद क्षीरसागर, अविनाश फाटक, भारती शिरसाट प्रभृतींनी  परिश्रम घेतले. 

टॅग्स :भालचंद्र मुणगेकर