Join us

संघर्ष समितीची ‘समेट समिती’ होऊ नये

By admin | Published: October 11, 2015 12:22 AM

त्या २७ गावांच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी समितीची भूमिका समजावून घेतली

डोंबिवली : त्या २७ गावांच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी समितीची भूमिका समजावून घेतली. त्या वेळी झालेल्या चर्चेत त्यांनी समितीला सांगितले की, तुमच्या भूमिकेला मनसेचेही समर्थन आहे. त्यामुळे संघर्ष समितीच्या बहिष्काराला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या समितीने सेटिंग करू नये, संघर्ष समितीची सेटिंग समिती होऊ देऊ नये, असा सल्लाही दिल्याची माहिती डोंबिवलीतील ब्राह्मण सभेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. मनसेला कोणत्याही पक्षाची आॅफर वगैरे काही आलेली नसून या वेळेसही पक्ष एकला चलो रे ची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी निवडणुकीचा जाहीरनामा मात्र अद्यापही जाहीर झालेला नाही. तो आगामी जाहीर सभांमधून स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास हरकत नाही, परंतु ती होण्यासाठी जबाबदार असलेले बिल्डर, नेते, महापालिकांचे अधिकारी आदींवरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नेहमीच अशा कारवायांमध्ये रहिवाशांना रस्त्यावर का आणले जाते, असा सवालही त्यांनी केला. सध्या केडीएमसीतही अशा पद्धतीने खारफुटी तोडून राजरोसपणे अनधिकृत बांधकाम बांधण्यात येत आहे. त्यावर वेळीच वॉच ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, अन्य शहरांसारखीच तेथेही बकाल अवस्था येईल. पक्षाच्या नगरसेवकांच्या कामाबाबत ५०-५० टक्के समाधानी असून ज्यांचे काम समाधानकारक नाही, त्यांना सूचित केले आहे. तसेच कोणी काम चांगले केले आहे, ते जनताच सांगू शकेल, असे ते म्हणाले. याखेरीज मुंबई, ठाणे पातळीवर असलेल्या प्रश्नांना त्यांनी बगल देऊन चर्चा करण्याचे टाळले. २७ गावांच्या जागावगळता सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. एक-दोनवगळता मनसेचे नगरसेवक मात्र कुठेही गेलेले नसल्याचे ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, निरीक्षक शिरीष सावंत, पक्षाचे चिटणीस, कल्याण जिल्हाध्यक्ष राजू पाटील, प्रकाश भोईर आदी उपस्थित होते.सध्या ज्याप्रमाणे भाजपा अन्य पक्षांच्या नगरसेवकांवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे, तसा अनुभव मनसेच्या नगरसेवकाला आला का, असे विचारले असता दबाव आणि मनसेवर, माझ्यावर. शक्य आहे का? वजनाने कोणी कितीही मोठे असले तरीही ते आमच्यावर दबाव टाकू शकत नाहीत, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला. निवडणुका आल्या की, पॅकेज दिले जाते. वर्षभर का दिले नाही. त्यामुळे भाजपाने दिलेले पॅकेज हे थाप आहे, तसे काहीच दिले जाणार नाही. विकास काय असतो, हे बघण्यासाठी चला नाशिकला, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मला एकहाती सत्ता द्या, बघा मग काय करतो ते, असा पुनरुच्चार त्यांनी केला.