कार्तिकी एकादशीला थांबणार 'संगीत देवबाभळी'ची दिंडी, श्री षण्मुखानंद सभागृहात रंगणार शेवटचा ५०० वा प्रयोग
By संजय घावरे | Published: November 20, 2023 03:53 PM2023-11-20T15:53:14+5:302023-11-20T15:54:21+5:30
मागील सहा वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या या नाटकाचा ५००वा आणि अखेरचा प्रयोग श्री षण्मुखानंद सभागृहात रंगणार आहे.
मुंबई - वारकरी संपद्रायातील देव आणि भक्ताचे नाते अनोख्या संहितेद्वारे रंगमंचावर सादर करणाऱ्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाची राज्यभर सुरू असलेली दिंडी कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर थांबणार आहे. मागील सहा वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या या नाटकाचा ५००वा आणि अखेरचा प्रयोग श्री षण्मुखानंद सभागृहात रंगणार आहे.
२२ डिसेंबर २०१७ या दिवशी भद्रकाली प्रॉडक्शनच्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा शुभारंभ झाला होता. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही 'संगीत देवबाभळी' ची नाट्य दिंडी विसावणार आहे. बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात या नाटकाचा शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे. 'संगीत देवबाभळी'चा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते; परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि नाट्यरसिकांच्या साथीने तो यशस्वही झाला. कोरोनासारखे भयाण संकट येऊनही रसिकांचे प्रेम कमी झाले नाही, ते चंद्रभागेच्या पाण्यासारखे वाहतच राहिले. याच बळावर या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार पटकावले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांना भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही 'देवबाभळी' आता ५००व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.