मुंबई : कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सोहळा प्रत्यक्षात होणार नसला तरी आभासी पद्धतीने राष्ट्रपतींकडून पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सन्मान होईल. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या यादीत महाराष्ट्राच्या २ शिक्षकांची निवड झाली आहे. त्यातील एक शिक्षिका मुंबईतील आहेत. मुंबईच्या आॅटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना रसायनशास्त्र विषयातील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. अगदी सोप्या सहज आणि किफायतशीर पद्धतींच्या मॉडेल्समधून रसायनशास्त्र विद्यार्थ्यांना शिकविण्याची किमया संगीता सोहनी करत आहेत.३५ वर्षांचा शिक्षकी पेशाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगीता सोहनी यांचे विद्यार्थी आज अनेक उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. शिकविण्याची आवड ही परंपरागत असलेल्या सोहनी या त्यांच्या चौथ्या पिढीतील शिक्षिका असून त्यांचा जन्म, शिक्षण आणि पहिल्या जॉबची पोस्टिंग ही हैदराबाद येथे झाली. १५ वर्षांच्या हैदराबादमधील अनुभवानंतर त्यांना मुंबईतील आॅटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात बदली मिळाली.संगीता सोहनी या कागद, टू डी यांच्या माध्यमातून लो कॉस्ट मॉडेल्स बनवून विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीने शिकवितातच, मात्र याशिवाय विज्ञान भारती संस्थेच्या विद्यार्थी विज्ञान मंथन प्रकल्पाच्या रिसोर्स पर्सन म्हणूनही काम पाहत आहेत. बॉम्बे असोसिएशन सायन्स एज्युकेशन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षणही त्या घेतात. अनेक मोठ्या आणि देशपातळीवरील परीक्षांचे पेपर सेटिंग्सचे काम त्या पाहत आहेत, शिवाय इंटरनॅशनल ज्युनिअर आॅलम्पियाडसारख्या स्पर्धांमध्येही मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. सुरुवातीपासूनच कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.केवळ त्या शिकवीत असलेले विद्यार्थी किंवा शैक्षणिक संस्थांमधील मार्गदर्शन यांच्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नाही. त्यांच्या परिसरातील, घरी काम करणाºया स्त्रिया, भाजीपाला विक्रेते, परिसरातील छोट्या संस्था यांच्यासाठीही त्या छोट्या सहज आणि सोप्या पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करतात. सामाजिक भान जपत दर आठवड्याला अन्नदानाचा उपक्रमही राबवतात.योग्य पद्धत अवलंबणे गरजेचेरसायनशास्त्र असो किंवा इतर विषय, विद्यार्थ्यांना विषयासंबंधी गोडी लावणे ही शिक्षकाची जबाबदारी असते. शिक्षकांनी विषयांची गोडी लावली की विषय चुटकीसरशी सोपा होतो. मात्र यासाठी शिकविण्याची योग्य पद्धत अवलंबणे हे शिक्षकाचे कर्तव्य असल्याचे सोहनी यांनी सांगितले. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याने आतापर्यंत केलेल्या ज्ञानदानाचे आणि कार्याचे चीज झाल्याची भावना संगीता सोहनी यांनी व्यक्त केली.
संगीता सोहनी; रसायनशास्त्रासारखा विषय सहज सोप्या पद्धतीने शिकवण्याची साधली किमया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:45 AM