सांगली : तब्बल १०७ महिलांचा बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी येथील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलचे डॉ. अर्जुन पाटील व त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा पाटील यांच्यासह डॉ. माधुरी विजय जाधव, डॉ. संतोष जयपाल पाटील यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात आज, बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला.महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी येथील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हास्पिटलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ऐनापुरे, किरण आनंदे, सुरेंद्र शिंदे यांच्या पथकाने येथील सोनोग्राफी सेंटर, वैद्यकीय गर्भपाताचे रजिस्टर व यंत्रसामग्रीची माहिती घेतली असता अनेक त्रुटी आढळून आल्या. डॉ. अर्जुन पाटील व सुषमा पाटील यांना गर्भपात करण्यास परवानगी नसतानाही या हॉस्पिटलमध्ये त्यांनी गेल्या दोन वर्षांत १०७ गर्भपात केल्याचे आढळून आले. ज्या डॉक्टरांना गर्भपात करण्याचा परवाना आहे, त्यांची मदत न घेता केवळ नाव नोंद करून त्यांनीच गर्भपात केल्याचे दाखविण्यात आले. गर्भपात करण्यासाठी पाटील दाम्पत्याने डॉ. माधुरी जाधव व डॉ. संतोष जयपाल जाधव यांची मदत घेतली. या चौघांकडेही गर्भपात करण्याचा परवाना किंवा आवश्यक असलेला वैद्यकीय परवाना नाही. या डॉक्टरांनी समाधानकारक खुलासा न केल्याने आज सायंकाळी त्यांच्यावर वैद्यकीय गर्भसमाप्ती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी झालेल्या या कारवाईनंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)आॅपरेशन थिएटर सीलगुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी श्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलचे आॅपरेशन थिएटर व सोनोग्राफी यंत्रही सील करण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, चौकशीअंतीच संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.
सांगलीत १०७ बेकायदा गर्भपात
By admin | Published: August 21, 2014 12:13 AM