संग्राम देशमुखांची चूक झाली, चंद्रकांत पाटलांना संबोधले 'माजी मुख्यमंत्री'
By महेश गलांडे | Published: November 18, 2020 01:46 PM2020-11-18T13:46:06+5:302020-11-18T13:49:19+5:30
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे संग्राम देशमुख विरुद्ध राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात सामना रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.
मुंबई : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 18 नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत वाढली असून नेतेमंडळींनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे. भाजपाने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना उमेदवार संग्राम देशमुख यांच्याकडून चूक झाली.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे संग्राम देशमुख विरुद्ध राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात सामना रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. संग्राम देशमुख सध्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रचारानिमित्त भेटीगाठी घेत आहेत. तर, अरुण लाड हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. संग्राम देशमुख यांनी प्रचारादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं. तसेच, या मतदारसंघातून गेल्या 10 ते 12 वर्षांपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्वा केल्याचे देशमुख यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख करताना देशमुख यांच्याकडून चूक झाली. कारण, त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा माजी मुख्यमंत्री असे संबोधले. देशमुख यांच्या या उल्लेखाने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अनावधानाने त्यांच्याकडून ही चूक झाल्याचे अनेकांच्या लक्षातही आले.
खानापूरचे दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पूत्र संग्रामसिंह यांना यापूर्वी पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी पक्षीय आदेशानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेत विश्वजीत कदम यांच्या निवडीची वाट मोकळी केली होती. संग्रामसिंह देशमुख सध्या जिल्हा बँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते. या सर्व कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना दुसऱ्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. देशमुख समथर्कांनी उमेदवारी जाहीर होताच जल्लोष केला.
एकाच जिल्ह्यात दोघांना उमेदवारी
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपने सांगली जिल्ह्यातील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.