- जमीर काझीमुंबई : खाकी वर्दीआडच्या काळ्या वर्तनाबद्दल राज्यभरातून ‘छी थू’ होवू लागल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कारर्किदीत घडलेल्या विविध गैरवर्तनाचे स्मरण झाले आहे. सांगलीतील अवैध धंद्याबरोबरच गैरकृत्ये व अधिका-यांच्या गैरप्रकाराचा पाढा वाचला आहे.नांगरे-पाटील यांनी चार पानी अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविला असून, त्यामध्ये शिंदे यांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली नसल्याचे नमूद केले आहे. या अहवालामुळे शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून त्यांच्यावरील कारवाई अटळ असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा गैरप्रकार लक्षात येण्यासाठी नांगरे-पाटील यांना इतका विलंब का झाला, असा सवाल वरिष्ठ पोलीस अधिकारी व वर्तुळातून उपस्थित होत आहे.सांगलीतील पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे या तरुणाची निर्घृण हत्या करून अंबोली घाटात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक युवराज कामटे व अन्य पोलीस सीआयडीच्या ताब्यात असले तरी वरिष्ठ अधिका-यांवर कारवाईसाठी सांगलीतील नागरिकांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठाच्या बेजाबदारपणाबाबत महासंचालक व गृह विभागाकडून सविस्तर तपास केला जात आहे.त्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी दत्ता शिंदे सांगलीच्या अधीक्षकपदी रुजू झाल्यापासून सांगलीत घडलेली विविध गैरकृत्ये, अधिका-यांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत सविस्तर आढावा घेतला आहे. त्यामध्ये वादग्रस्त उपनिरीक्षक कामटे याच्यावर पूर्वीच्या प्रकरणात खातेनिहाय कारवाई प्रलंबित ठेवणे, कामटेने कोथळे हा कोठडीतून पळून गेल्याची खोटी माहिती दिल्यानंतर योग्य कारवाई न करणे, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला मटका, जुगार व अवैध धंदे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नसताना वरिष्ठाकडे जबाबदारी न देता मर्जीतील अधिका-याकडे सूत्रे सोपविणे, निलंबित महिला निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तक्रारदार महिलेवर केलेल्या खोट्या कारवाईमुळे आत्महत्येची, पोलिसांकडून ९ कोटीच्या दरोड्याचे प्रकरण, चांदोली अभयारण्यात वनविभागाची परवानगी नसताना दरोडेखोरांना शोधण्याच्या बहाण्याने सफर करणे आदी विविध घटना विस्तृतपणे मांडल्या आहेत. हे सर्व प्रकार गंभीर स्वरुपाचे असल्याने शिंदे यांना त्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची उचलबांगडी निश्चित असून लवकरच ‘साईड’ पोस्टिंग दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.------------आतापर्यंत दुर्लक्ष का?सांगली जिल्ह्यात अवैध धंदे व गैरप्रकार उघडपणे सुरू असल्याचे महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी अहवालात नमूद केले असले तरी यापूर्वी त्याबाबत त्यांनी का कार्यवाही केली नाही, आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यामागील कारण काय, त्याबाबत त्यांना आताच कशी जाग आली, की आपल्यावरील जबाबदारी टाळण्यासाठी हा अहवाल बनविला, असा सवाल वरिष्ठ अधिका-यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.------------सांगलीतील घटना अमानुष असून वरिष्ठ अधिका-यांकडून हे प्रकरण व्यवस्थित हाताळण्यात आलेले नाही. त्याबाबतचा अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच चर्चा करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल.-सतीश माथूर ( पोलीस महासंचालक)