मतदार महिलांना मिळणार सॅनिटरी नॅपकीन, उपनगर जिल्हाधिकारींचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 02:21 AM2019-04-28T02:21:16+5:302019-04-28T02:21:45+5:30
निवडणुकीच्या काळात मतदान केल्यास महिला मतदारांना गिफ्ट म्हणून सॅनिटरी नॅपकीन देण्याचा अभिनव उपक्रम उपनगर जिल्हाधिकारींच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार आहे
मुंबई : निवडणुकीच्या काळात मतदान केल्यास महिला मतदारांना गिफ्ट म्हणून सॅनिटरी नॅपकीन देण्याचा अभिनव उपक्रम उपनगर जिल्हाधिकारींच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार आहे. उपनगरातील सखी केंद्रात हे वाटप करण्यात येणार आहे.
उपनगरात ३२ लाख ५७ हजार २३८ महिला मतदार आहेत. यात, १ लाख ६४ हजार ३२२ एवढी वाढ झाली. महिला मतदारांनी जास्तीत जास्त पुढे यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी लिंगभेद निर्मलून जाणीव जागृतीसह महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघ क्षेत्रामध्ये मतदानाच्या दिवशी केवळ महिला कर्मचाऱ्यांना संचालित होणारे प्रत्येकी एक मतदान केंद्र प्रतिकात्मक स्वरुपात उभारण्यात आले आहेत. त्याला सखी केंद्र असे नाव देण्यात आले आहेत. याच सखी केंद्रात येणाऱ्या महिला मतदारांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे. विधानसभेनुसार एक सखी केंद्र अशी उभारणी करण्यात आली आहे. सखी केंद्राच्या बाहेर रांगोळीही काढण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरणाबरोबरच त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत जनजागृती करण्यासाठी सॅनीटरी नॅपकीन देण्यात येणार आहे. विधानसभेतील प्रत्येक एका केंद्रानुसार, सरासरी ६०० महिला मतदान करतात. सुमारे दिड ते पावणे दोन लाख सॅनीटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे. - सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर