मुंबई : ‘सॅनिटरी पॅड रेशनिंगवर मोफत उपलब्ध करून द्या,’ या मागणीसाठी गुरुवारपासून आझाद मैदानात सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनात आता सामाजिक संस्थांसह राजकीय पक्षही उतरले आहेत. या आंदोलनाला शुक्रवारी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि समर्थ प्रतिष्ठान यांनीही पाठिंबा दर्शवला.विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या सरचिटणीस छाया काकडे यांनी या मागणीसाठी गुरुवारपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन पुकारले आहे. मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आंदोलनाला पाठिंबा देणारे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, महिलांसाठी ठिकठिकाणी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यापेक्षा हा मार्ग अधिक सोपा आहे. रेशनिंग व्यवस्था ग्रामीण भागापासून शहरातील झोपडपट्टी परिसरात पोहोचलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा या उपक्रमासाठी करण्याची मागणी रास्त आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष दिल्यास नक्कीच लाखो महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटेल. केवळ सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन लावण्याचे काम प्रशासनाला करावे लागेल. त्यामुळे काकडे यांच्या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे सावंत यांनी सांगितले.समर्थ प्रतिष्ठानचे साई आदमाने यांनी सांगितले की, मुंबईतील दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी काम करताना ही मागणी प्रकर्षाने समोर येते. सॅनिटरी पॅड परवडत नसल्याने अनेक महिलांना वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत रेशन व्यवस्थेद्वारे महिलांना सॅनिटरी पॅड मिळाल्यास नक्कीच मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे काकडे यांच्या आंदोलनात सक्रिय सामील झाल्याचे आदमाने यांनी स्पष्ट केले.
सॅनिटरी पॅड रेशनिंगवर द्या! सामाजिक संस्थांचाही पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:16 AM