महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून राज्यातील 9 महिला कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 06:59 PM2018-07-02T18:59:08+5:302018-07-02T19:01:02+5:30
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून राज्यातील विविध महिला कारागृहात असणाऱ्या महिला कैदींकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच वापर झालेले पॅड नष्ट करण्याकरिता बर्निंग मशीन देण्यात येत आहे
मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून राज्यातील विविध महिला कारागृहात असणाऱ्या महिला कैदींकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच वापर झालेले पॅड नष्ट करण्याकरिता बर्निंग मशीन देण्यात येत आहे. कारागृहात असणाऱ्या महिलांना सुविधा मिळाव्यात यासाठी हे पाऊल उचलल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून भायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यू संदर्भात तसेच राज्यातील कारागृहात असणारया महिला कैद्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, आहार, आरोग्य व सुरक्षितता आणि अनुषंगिक बाबींची चौकशी करण्यासाठी तसेच त्यासंबंधीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथक (SIT) चा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने महिला कैद्यांना सुविधा मिळावी यासाठी आयोगाकडून राज्यातील ९ महिला कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि वापर झालेले पॅड नष्ट करण्याकरिता बर्निंग मशीन देण्यात येत आहे.
वेंडिंग मशीन कारागृहात देताना सोबत ५० नॅपकिन आयोगामार्फत देण्यात येत आहेत. त्यानंतर वेंडिंग मशीन आणि बर्निंग मशीनची सुरक्षा व देखभाल करणे, वेळोवेळी मशीनमध्ये सॅनिटरी पॅड भरणा करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधणे याची कारागृह प्रशासनाची असणार आहे. तसेच सॅनिटरी पॅड मोफत देणे किंवा अत्यल्प दरात देण्याबाबतचा निर्णय संबंधित जेल प्रशासनाचा असणार आहे.
महिला कैद्यांच्या हक्कांसाठी आयोग सजग असून त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन लावण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.