मुंबई : पालिका शाळांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग आणि बर्निंग मशीन बसवण्यात येणार आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षी पालिका शाळांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग आणि बर्निंग मशीन बसवण्यात आले होते. मात्र यंदा प्रथमच महापालिकेच्या शैक्षणिक २०१७-२०१८च्या अर्थसंकल्पात यासाठी १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.‘स्वच्छतागृह माझा अधिकार’ या चळवळींतर्गत महिलांसाठी ६५हून अधिक सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवले होते. म्हणून शालिनी ठाकरे यांनी सरकारकडे आणि पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची भेट घेऊन महाविद्यालयांमध्येदेखील सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवाव्यात अशा सूचना केल्या; तसेच मनपा आयुक्त अजय मेहता यांना भेटून महापलिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्यात याव्यात म्हणून आग्रह धरला. अखेर मुंबई महापालिकेच्या २०१७-२०१८च्या वार्षिक अर्थसंकल्पात या मागणीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी त्यांनी दोन बैठका घेऊन शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवाव्यात व इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अतिशय कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावेत म्हणून मागणी केली होती. (प्रतिनिधी)
शाळांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन
By admin | Published: March 31, 2017 6:59 AM