मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व ग्रीन लाइन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंंधरा दिनाचे औचित्य साधून सोमवारी सकाळच्या सुमारास उद्यानात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी पर्यावरणप्रेमींनी उद्यानाच्या परिसरातून ‘मॅक्सिकन पॉपी’ ही झाडे मोठ्या प्रमाणात काढण्यात आली. तसेच वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांनी बिबट्यांच्या अधिवासाबाबत माहिती आणि जनजागृती केली. याप्रसंगी शालेय विद्यार्थी, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता.मॅक्सिकन पॉपी ही झाडे काढताना खूप परिश्रम घ्यावे लागतात. स्वच्छता मोहिमेला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला असून उद्यानात ही मोहीम उत्तमरीत्या पार पाडण्यात आली. उद्यान प्रशासनाकडून पर्यावरण संदर्भातील सगळेच दिवस मोठ्या उत्साहात साजरे होतात. या वेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी असतात. पर्यावरणासंबंधित सर्व माहिती नागरिकांना मिळावी आणि यातून पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाला हातभार लागावा, हा एसजीएनपीचा उद्देश असतो, अशी माहिती निसर्ग माहिती केंद्राचे शिक्षण व विस्तार अधिकारी जयेश विश्वकर्मा यांनी दिली.‘अर्थ डे’निमित्ताने मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना एकत्र करून त्यांना पर्यावरणाबाबत माहिती आणि स्वच्छता मोहीम हा कार्यक्रम योजिला होता. सध्या तरुणाईमध्ये पर्यावरणाबाबत प्रेम, आपुलकी आणि आस्था निर्माण होत आहे. पर्यावरण जनजागृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, हा यामागचा उद्देश होता, अशी माहिती ग्रीन लाइन संस्थेचे कार्यक्रम अधिकारी स्वानंद गावडे यांनी दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 2:07 AM