रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन सेवा मोफत घरपोच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात असतानाच आता मुंबईतल्या गोरेगाव आरे कॉलनीतील दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा बळकट केली जात आहे. याच कामाचा एक भाग म्हणून येथे आवश्यक ठिकाणी सॅनिटायजरची फवारणी केली जात असून, आवश्यक तेथे आरोग्याच्या सुविधा दिल्या जात आहेत. यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा समावेश आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून सातत्याने हे काम केले जात आहे. आरे कॉलनीतील आदिवासी पाडे आणि झोपडपट्टीबहुल भागातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात यावा म्हणून आदिवासी पाड्यांत काम केले जात आहे. १५ दिवसांपासून गोराई येथील आदिवासी पाड्यात फवारणी करण्यात आली. आरे कॉलनीतील मयूर नगर, युनिट क्रमांक २२, आदर्श नगर, युनिट क्रमांक १६, आरे रुग्णालय परिसर, कोंबड पाडा अशा अनेक ठिकाणी फवारणी नियमित होत आहे, असे मुंबई आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुनील कुमरे यांनी सांगितले. ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयांत बेड व ऑक्सिजन मिळत नाही अशा गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या घरी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन सेवा रुग्णांसाठी मोफत घरपोच दिली जात आहे.
..........................