एसटीच्या मुंबई सेंट्रल डेपोत ट्रॅकरद्वारे सॅनिटायझर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 07:09 PM2020-04-07T19:09:24+5:302020-04-07T19:11:00+5:30
एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल डेपोमध्ये सॅनिटायझर फवारणी केली आहे,
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये, यासाठी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल डेपोमध्ये सॅनिटायझर फवारणी केली आहे, हि फवारणी मुंबई अग्निशमन दल यांच्यातर्फे ट्रॅक्टरवरून मंगळवारी करण्यात आली. एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून फवारणी केली गेली.
सध्या एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस धावत आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल आगरात मुंबई अग्निशमन दल यांच्यातर्फे ट्रॅक्टरवरून फवारणी करण्यात आली. यासह ठाणे, पालघर या विभागातील एसटीच्या डेपो आणि बस स्थानकांत सॅनिटायझर फवारणी केली जाईल. मुंबई सेंट्रल डेपोत मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीदेखील संपूर्ण आवारात व बसवर फवारणी केली आहे.कोरोना विषाणूमुळे २४ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे.
कोरोना विषाणूविरोधात लढाईत वैद्यकीय कर्मचारी, महापालिका, पोलीस, बँक, महाराष्ट्र शासन व इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या विभागातून एसटी महामंडळाकडून एसटीच्या बस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने एसटी द्वारे बसवर, डेपोत सॅनिटायझर फवारणी केली जात आहे. यासह वैयक्तिक सुरक्षेसाठी सॅनिटायझर हॅन्ड वॉश आणि मास्क देण्यात येत आहे. एसटीच्या बस डेपो आणि बस स्टॅन्डवर सुद्धा स्वच्छतेची काळजी घेण्यात येत आहे.