मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह की संजय बर्वे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:24 AM2019-02-11T02:24:10+5:302019-02-11T02:24:38+5:30

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्दीला या महिनाअखेरीस पूर्ण विराम मिळणार असल्याने, मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल हे त्या पदाची धुरा सांभाळणार हे निश्चित झाले आहे.

 Sanjay Barve of the new Police Commissioner of Mumbai Parambbir Singh? | मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह की संजय बर्वे?

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह की संजय बर्वे?

Next

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्दीला या महिनाअखेरीस पूर्ण विराम मिळणार असल्याने, मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल हे त्या पदाची धुरा सांभाळणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांच्या नावांची मुंबई चर्चा सुरू असून, परमबीर सिंह यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आयुक्तांची नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नव्या शिलेदाराची निवड करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे. नव्या आयुक्ताबरोबरच खात्यातील वरिष्ठ स्तरावरील काही पदामध्ये फेरबदल करावा लागण्याची शक्यता आहे.
केंद्राने दोन वर्षांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने, दत्ता पडसलगीकर आठ महिन्यांच्या कालखंडानंतर २८ फेबु्रवारीला निवृत्त होतील. त्यांच्यानंतर १९८५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आणि गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची धुरा सांभाळत असलेल्या सुबोध जायस्वाल यांची डीजीपी पदावर निवड होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोणाला बनविले जाते, याबद्दल उत्सुकता आहे. या पदासाठी जयस्वाल यांच्या नियुक्तीपूर्वी संजय बर्वे व परमबीर सिंह यांची नावे गेल्या दीड दोन वर्षांपासून सातत्याने घेतली जात होती, आताही हीच दोन नावे आघाडीवर आहेत.
संजय बर्वे हे १९८७च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असून, गेल्या ५ महिन्यांपासून एसीबीचे प्रमुख म्हणून काम करीत आहेत. वास्तविक, जयस्वाल यांच्यानंतर पोलीस दलात होमगार्डचे महासमादेशक संजय पांडे हे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. मात्र त्यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. परमबीर सिंह हे १९८८च्या बॅचचे अधिकारी असून अप्पर महासंचालक झाल्यावरही ते मुंबईच्या आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्याहून बिपीन बिहारी (पोलीस गृहनिर्माण), सुरेद्र पांडे (कारागृह), डी. कनकरत्नम (सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे ( विधी व तंत्रज्ञ) हे १९८७च्या बॅचचे अधिकारी ज्येष्ठ आहेत. मात्र, कामाची धडाडी आणि मुख्यमंत्र्यांशी असलेल्या सलगीमुळे परमबीर सिंह यांच्या नावाची चर्चा होत आहे.

रश्मी शुक्लांची संधी लांबणीवर?
मुंबईच्या आयुक्तपदाच्या शर्यतीसाठी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त आणि ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांचेही सुरुवातीला घेतले जात होते. मात्र, पडसलगीकर यांना जर दोन वर्षांची मुदतवाढ नाकारण्यात आल्याने त्यांची संधी तूर्तास हुकली आहे. संजय बर्वे, परमबीर सिंह हे ज्येष्ठ आयपीएस असल्यामुळे त्यांना आता संधी मिळणार नाही, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

संजय पांडेंवर अवकृपा
पोलीस दलात सुबोध जायस्वाल यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ अधिकारी हे संजय पांडे असले, तरी गेल्या साडेतीन वर्षांपासून सरकारने त्यांना ‘होमगार्ड’मध्ये ठेवले आहे. धडाडीने काम करणारा अशी ओळख असलेल्या पांडे यांनी वैधमापन विभागात नियंत्रक म्हणून काम पाहताना सरकारला कोट्यवधीचा महसूल मिळवून दिला होता. मात्र, विविध कारणांमुळे राज्य सरकारची त्यांच्यावर अपकृपा आहे.

- संजय बर्वे ३० आॅगस्टला निवृत्त होणार असल्याने, त्यांना नियुक्तीनंतर केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळेल, तर परमबीर सिंह हे ३० जून, २०२१ पर्यंत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती झाल्यास ते दोन वर्षे पदावर राहण्याची शक्यता आहे.

Web Title:  Sanjay Barve of the new Police Commissioner of Mumbai Parambbir Singh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस