संजय घावरे, मुंबई : चित्रकार संजय भट्टाचार्य 'मूव्हिंग जिओमेट्री' या नवीन प्रदर्शनासह कलाप्रेमींना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. सात वर्षांच्या कालावधीनंतर भट्टाचार्य यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे.
गॅलरी नव्याची प्रस्तुती असलेले 'मूव्हिंग जिओमेट्री' हे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ५ ते ११ मार्च या कालावधीत भरणार आहे. भट्टाचार्य त्यांच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये कलात्मक अभिव्यक्तीचे सार प्रकट करतात. रवींद्रनाथ टागोरांच्या पश्चिम बंगालमधील असलेले भट्टाचार्य सध्या नवी दिल्लीत स्थायिक आहेत. त्यांची भेदक तरीही कोमल नजर कलाकृतींद्वारे सर्जनशीलतेने परिपूर्ण दर्शन घडवते. ६६ वर्षीय या ज्येष्ठ कलाकाराचे 'मूव्हिंग जॉमेट्री' हे प्रदर्शन त्यांच्या आधीच्या यथार्थवादी कलाकृतींपेक्षा पूर्ण भिन्न आहे. या प्रदर्शनात कॅनव्हासवर बारकाईने तयार केलेल्या १४ तैलचित्रांचा संग्रह असेल. यातील प्रत्येक कामात कलाप्रेमींना भट्टाचार्यांचे दोन वर्षांचे कामातील समर्पण बघण्याची संधी मिळेल.
या प्रदर्शनाबाबत भट्टाचार्य म्हणाले की, आपल्या सर्व भावना भौमितिक स्वरूपात प्रकट होतात असे जेव्हा मला समजले, तेव्हा मी 'मूव्हिंग जिओमेट्री' या संकल्पनेवर काम करण्याचा निर्णय घेतला. २००६च्या सुरुवातीला हे पॅटर्न्स माझ्या कॅनव्हासवर आले आणि त्यानंतरच्या मालिकेत आवर्ती आकृतिबंध प्रकट होत राहिले. भौमितिक आकार केवळ बाह्य जगामध्येच नव्हे तर आपल्या भावनांमध्ये देखील दिसून येतात, जे निसर्ग आणि मानवी अनुभव यांच्यातील आंतरिक संबंध दर्शवतात. आपण तणावग्रस्त असल्यावर आपली विचार प्रक्रिया त्रिकोणाचा आकार घेते. गतस्मृतींचा विचार करताना ही प्रक्रिया चारी बाजूला फिरून एक वर्तुळ होते आणि जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा ती लहान वर्तुळे किंवा बिंदूंमध्ये रूपांतरित होते. त्याचेच प्रतिबिंब या प्रदर्शनात दिसेल असेही ते म्हणाले.