Join us

प्रभारी विरोधी पक्षनेतेपदी संजय भोईर

By admin | Published: November 07, 2015 2:17 AM

परमार आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचे नाव आल्यानंतर अखेर आता त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरूनही दूर व्हावे लागले आहे. त्यांच्याऐवजी प्रभारी विरोधी

ठाणे : परमार आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचे नाव आल्यानंतर अखेर आता त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरूनही दूर व्हावे लागले आहे. त्यांच्याऐवजी प्रभारी विरोधी पक्षनेते म्हणून संजय भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांनंतर हे पद कायम करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. एकूणच परमार आत्महत्या प्रकरणामुळे जगदाळेंची या पदावरून हकालपट्टी होण्याचे संकेतच यातून मिळाले आहेत.मागील महिन्यात ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची नावे पुढे आली आहेत. सध्या उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला असला तरी येत्या २ डिसेंबरला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, या चौघांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागल्याने आता त्याचा पहिला फटका जगदाळेंना बसला आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून त्यांना तात्पुरते हटविले असून प्रभारी विरोधी पक्षनेतेपदी संजय भोईर यांची निवड झाली आहे. परंतु, येत्या काही दिवसांत पूर्णवेळ कार्यभारही त्यांच्या हाती येण्याची शक्यता असल्याने त्यांना हा मोठा राजकीय फटका असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)नजीब मुल्ला शहराध्यक्षपदावरून हटणार !नजीब मुल्ला यांची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी एक वर्षापूर्वीच निवड झाली होती. परंतु, आता परमार आत्महत्या प्रकरणात त्यांचेही नाव आल्याने आता त्यांच्याभोवती पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. त्यामुळे जगदाळेंपाठोपाठ आता त्यांचीही शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यासाठी त्यांचा विरोधी गट सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, विक्रांत चव्हाण यांनाही इंटकच्या स्थानिक पदावरून हटविण्यात आले आहे.