मुंबई - मनसे महाआघाडीत सामील झाल्यानंतर ईशान्य मुंबईची जागा मनसे लढवणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना पाटील यांची उमेदवारी जवऴपास निश्चित झाली आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
आगामी लोकसभा निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. शिवसेना-भाजपा यांची युती जाहीर झाली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर झाला नाही. मागील निवडणुकांमधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फॉम्युला मुंबईसाठी सारखाच राहील. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागापैंकी काँग्रेस 5 जागा तर राष्ट्रवादी 1 जागांवर निवडणूक लढवते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला जातो. याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय दीना पाटील यांनाच पुन्हा संधी मिळू शकते.
सध्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे किरीट सोमय्या खासदार आहेत. त्यामुळे सोमय्या विरूध्द संजय दीना पाटील अशीच लढत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकते. गोवंडी, मानखुर्द हा मुस्लिम बहूल भाग तर मुलुंड, घाटकोपर, कांजुरमार्ग, विक्रोळी यासारखा मराठी पट्टा मिळून हा मतदारसंघ तयार होतो.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत संजय दीना पाटील हे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. त्यावेळी किरीट सोमय्या यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता मात्र 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा फटका बसल्याने संजय दीना पाटील यांना पराभूत झाले. सध्या ईशान्य मुंबईत भाजपचे 3 आमदार, शिवसेनेचे 2 आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार असे संख्याबळ आहे.