नियमांचे उल्लंघन करून संजय दत्तची सुटका नाही - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 02:12 AM2018-02-02T02:12:14+5:302018-02-02T02:12:25+5:30
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याला आठ महिने आधी कारागृहातून सोडण्यात आले. त्याला ही सवलत देताना कारागृह प्रशासनाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याला आठ महिने आधी कारागृहातून सोडण्यात आले. त्याला ही सवलत देताना कारागृह प्रशासनाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. संजय दत्त याला १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांत पाच वर्षे कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. संजय दत्त व अन्य कैद्यांमध्ये कोणताही भेदभाव केला नाही, हा कारागृह प्रशासनाने केलेला दावा पुराव्यानिशी सिद्ध केल्याचे म्हणत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांनी संजय दत्त याच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका निकाली काढली.
संजय दत्त याला शिक्षेत
आठ महिने सवलत देण्यात आली. तसेच त्याची परोल व फर्लोवर वारंवार सुटका करण्यात आली. कारागृह प्रशासनाने अन्य कैदी व संजय
दत्त यांच्यात भेद करत संजय दत्तला झुकते माप दिल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते प्रदीप
भालेकर यांनी जनहित याचिकेद्वारे केला होता.
गृह विभागाने सादर केलेले रेकॉर्ड्स आणि त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरण यात विसंगती असल्याचे आम्हाला आढळले नाही. सरकारने स्वेच्छाअधिकारांचा गैरवापर केलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले. मात्र, यापुढे राज्य सरकारवर पक्षपातीपणाचा ठपका ठेवण्यात येऊ नये, यासाठी सरकारने सर्व कैद्यांचे फर्लो व परोलचे अर्ज जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने निकाली काढावेत. सरकार परोल व फर्लो मंजूर करताना पक्षपातीपणा करत असल्याचे जनतेचे किंवा कैद्यांचे मत व्हायला नको, असेही न्यायालयाने म्हटले.
कारागृहातील अनेक कैद्यांचे वर्तन नियमाला अनुसरून असूनही त्यांना कधीच संजय दत्तप्रमाणे शिक्षेत सवलत मिळत नाही, असेही याचिकेत म्हटले होते. मात्र, सरकारने हा
आरोप फेटाळला.
आपला निर्णय योग्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी गेल्या सुनावणीत सरकारने संजय दत्त किती दिवस कारागृहात राहिला, त्याला किती दिवसांसाठी परोल व फर्लो मंजूर करण्यात आला. त्याची परोल व फर्लोवर सुटका करण्याची कारणे इत्यादी तपशीलवार माहिती न्यायालयात सादर केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, येरवडा कारागृहातील एकाही कैद्याने त्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले व संजय दत्तला झुकते माप देण्यात आल्याची तक्रार केली नाही.