Join us

संजय दत्तने 'रासप' प्रवेशाचे वृत्त फेटाळले, बंधू महादेव जानकरांना दिल्या शुभेच्छा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 5:55 PM

अभिनेता संजय दत्त 25 तारखेला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार होते, असा दावा रासपाचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर यांच्याकडून करण्यात आला

मुंबई - अभिनेता संजय दत्त यांनी राष्ट्रीय समाजवादी पक्षातील प्रवेशाचे वृत्त फेटाळे आहे. तसेच, महादेव जानकर यांना निवडणुकांसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. रविवारी शिवाजी पार्कवर झालेल्या रासपच्या मेळाव्यात अभिनेता संजय दत्त यांनी व्हिडिओद्वारे महादेव जानकर हे माझे बंधू असल्याचे सांगत रासपच्या वर्धापनदिनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर, महादेव जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. 

अभिनेता संजय दत्त 25 तारखेला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार होते, असा दावा रासपाचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर यांच्याकडून करण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्क येथील मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते. या सभेत संजय दत्त यांच्याकडून रासपाला शुभेच्छा देत असल्याचा व्हिडीओ दाखविण्यात आला होता. संजय दत्त यांनी यापूर्वी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविली होती. संजय यांची बहिण प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. तसेच त्यांचे वडिल दिवंगत सुनील दत्त हेदेखील काँग्रेसचे खासदार होते. 

शिवाजी पार्क येथील मेळाव्यात बोलताना महादेव जानकर म्हणाले की, संजय दत्त दुबईत असल्याकारणाने या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याकडून 25 सप्टेंबरची तारीख देण्यात आली आहे. नाहीतर आजच्या मेळाव्यात संजय दत्त यांनी राष्ट्रीय समाज पार्टीत जाहीर प्रवेश केला असता, असे जानकर यांनी म्हटलं होतं. मात्र, संजय दत्तने हे वृत्त फेटाळले आहे. ''संजय दत्तने जानकर यांच्या वृत्तानंतर माध्यमांना प्रतिकिया दिली आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. महादेव जानकर हे माझे जवळचे मित्र असून ते मला बंधुसमान आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा, असे म्हणत संजय दत्त यांनी रासप प्रवेशाचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

दरम्यान, अभिनेते संजय दत्त हे मित्र व भावासारखे आहेत. सध्या ते चित्रपट निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय समाज पक्षातील प्रवेश तूर्तास टळला आहे. मात्र, ते आगामी विधान सभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे माहिती रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले.  

टॅग्स :संजय दत्तमहादेव जानकरराजकारणमुंबई