Join us

संजय दत्त येणार चार्टर्ड विमानाने

By admin | Published: February 24, 2016 2:14 AM

अभिनेता संजय दत्तची २५ फेब्रुवारी रोजी येरवडा तुरुंगातून सुटका होणार असून, मीडिया आणि चाहते यांना टाळण्यासाठी तो पुणे ते मुंबई हा प्रवास चार्टर्ड विमानाने करणार असल्याचे समजते.

मुंबई : अभिनेता संजय दत्तची २५ फेब्रुवारी रोजी येरवडा तुरुंगातून सुटका होणार असून, मीडिया आणि चाहते यांना टाळण्यासाठी तो पुणे ते मुंबई हा प्रवास चार्टर्ड विमानाने करणार असल्याचे समजते. पुणे- मुंबई हाय वेचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मुंबईतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बांद्रा येथील संजय दत्तच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी पाहता सुरक्षेसाठी हा बंदोबस्त ठेवला जाईल. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास संजय दत्त तुरुंगातून बाहेर येणार आहे. अन्य आरोपीप्रमाणेच त्यालाही तुरुंगातून बाहेर सोडण्यात येईल. सुरक्षेच्या कारणास्तवच संजय दत्त चार्टर्ड विमानाने मुंबईला येणार आहे. रस्त्याने आल्यास मोठ्या संख्येने मीडियाची वाहने त्याच्या मागे राहतील. मागील आठवड्यातच हा महामार्ग ब्लॉक झाला होता, याची आठवणही या अधिकाऱ्याने करुन दिली. तुरुंगाच्या बाहेर गर्दी करु नये, असे संजय दत्तच्या जवळच्या मित्रांनाही सांगण्यात आले आहे. तुरुंगाच्या बाहेर संजय दत्त यांची बहीण व अन्य एक नातेवाईक जोडपे असेल असे समजते. (प्रतिनिधी)