संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र नागरिकांना ओळखपत्र वाटप
By मनोहर कुंभेजकर | Published: September 6, 2023 05:10 PM2023-09-06T17:10:53+5:302023-09-06T17:11:50+5:30
८५० गरजूंना पेन्शन पास होऊन लाभाची रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते.
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागा मार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना राबविण्यात येते या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाराष्ट्र शासन संजय गांधी पेन्शनचे आदेशपत्र आणि ओळखपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी अनेक नागरिकांना सतत सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारावे लागतात. यातून वेळ तर जातोच शिवाय पैसेही खर्च होतात.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना आमदार मुख्य प्रतोद, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या माध्यमातून श्यामजी बापू मंदिर हॉल मालाड (पूर्व) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात योजना पात्र नागरिकांना महाराष्ट्र शासन संजय गांधी पेन्शनचे आदेशपत्र आणि ओळखपत्र वितरित करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुनील प्रभू यांच्या समवेत तहसीलदार इरेश चप्पलवार ,नायब तहसिलदार रुपेश पालवे, लता कोळी.माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर,माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे,विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, विधानसभा समन्वय आशा केणी, उपविभाग प्रमुख सुनील गुजर, भाई परब, उपविभाग समन्वय कृष्णा सुर्वे शाखाप्रमुख अशोक राणे, मनोहर राणे, संपत मोरे, महिला शाखा संघटक पद्मा राऊळ, उपलेखापाल रविदास गवळी, तलाठी शेख, यासर पटेल, शरद हरड, प्रकाश मोरे, शशिकांत कवठेकर, वनमाला कदम, अक्षता पांचाळ, जेष्ठ नागरिक आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आतापर्यंत अंदाजे ८५० गरजूंना पेन्शन पास होऊन लाभाची रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते. तसेच ६००० जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. विधानसभा अधिवेशन काळात पेन्शनच्या मानधन रकमेमध्ये वाढ होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार प्रभू यांनी सांगितले.