Join us

जोगेश्वरीतील संजय गांधी सबवेला तडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 1:36 AM

दररोज सबवेवरून मुंबई-अहमदाबादच्या दिशेने हजारो वाहने ये-जा करतात.

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील संजय गांधी सबवेला तडे गेले आहेत. दररोज सबवेवरून मुंबई-अहमदाबादच्या दिशेने हजारो वाहने ये-जा करतात. वाहने जात असताना त्यांच्या वजनाने सबवेच्या स्लॅबचा काही भाग खाली कोसळतो. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संजय गांधी नगर व अंधेरीतील पंप हाउस भुयारी मार्गाच्या (सबवे) रुंदीकरणानंतर जोगेश्वरी तसेच अंधेरी पूर्व येथील वाहनचालकांची वाहतूककोंडीपासून सुटका होईल, असे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजनादरम्यान दिले होते. मात्र, चार वर्षे उलटली तरीही दोन्ही भुयारी मार्गांच्या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यामुळे जोगेश्वरीवासीयांसह अंधेरीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय गांधी सबवेला तडे गेल्यामुळे उड्डाणपुलाच्या भागातील स्लॅब कोसळून लोखंडी सळ्या दिसत आहेत. हा सबवे जुना असून कित्येक वाहनांवर स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.राज्यमंत्री रवींद्र वायकर यासंदर्भात म्हणाले की, भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा आराखडा तयार होता. निधीही जमा करण्यात आला होता. परंतु महामार्गावरून मेट्रो जात असल्याने रुंदीकरणाच्या कामासाठी एमएमआरडीए आणि पोलिसांनीही परवानगी नाकारली. त्यामुळे सर्व निधी परत गेला. तरीही भुयारी मार्गांचे काम झाले असते; मात्र, सत्तेतील लोकांनी यात राजकारण आणले. त्यानंतर पुन्हा निधीला मंजुरीही मिळाली असून तरीदेखील ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने काम रखडलेल्या स्थितीमध्ये आहे.यासंदर्भात अनेक बैठका झाल्या आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही नऊ बैठका झाल्या. आता जरी परवानगी मिळाली, तर पुढील दोन दिवसांत काम सुरू होईल. जोगेश्वरी संजय गांधी नगर व अंधेरीतील पंप हाउस भुयारी मार्गाच्या रुंदीकरणासाठी ३२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे, असेही रवींद्र वायकर यांनी सांगितले़संजय गांधी सबवे आणि पंप हाउस सबवे रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन्ही सबवेमध्ये ट्राफिकची गंभीर समस्या आहे. तसेच संजय गांधी सबवेला तडे जाऊन लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे.- मनीष पटेल, कार्यकर्ता, आम आदमी पार्टी

टॅग्स :मुंबईमहामार्ग