छट पूजेसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरेत कृत्रिम तलाव उभारण्यास हिरवा कंदील
By मनोहर कुंभेजकर | Published: November 17, 2023 08:43 PM2023-11-17T20:43:30+5:302023-11-17T20:43:39+5:30
खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला आले यश
मुंबई-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात इको सेन्सेटिव्ह झोन सनियंत्रण समितीच्या आज दि,17 रोजी झालेल्या बैठकीनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरेत या दोन्ही ठिकाणी वाहनतळांच्या जागेत येणाऱ्या छट पूजेसाठी परवानगी दिली आहे.उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला ही माहिती दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक यांची पूर्व परवानगी घेऊन या उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वाहन तळ परिसरामध्ये कृत्रिम तलाव उभारून छट पूजेचे आयोजन करण्यात येत असल्याचे पत्र आर मध्य विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्याला दिल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक ( दक्षिण) रेवती कुळकर्णी यांनी दि,19 नोव्हेंबर दुपारी 4 पासून ते दि,20 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत येथे कृत्रिम तलावाचा वापर करण्याबाबत आर मध्य विभागाला एनओसी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेत छट पूजेसाठी परवानगी मिळावी यासाठी आपण पशु व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंग चहल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपवनसंरक्षक यांची भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेवून त्यांना निवेदन दिले व पाठपुरावा केला होता अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. पण 2016 पासून दूध विकास अधिकारी तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मागणीवरून खोट्या बातम्या पसरवून हिंदू सणांमध्ये व्यत्यय आणत असल्याचा आरोप भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला.
एका अधिकाऱ्याने २०१६ मध्ये राष्ट्रीय उद्यानाच्या नदीत मगर आल्याचे सांगितले होते. त्यानंतर सुरक्षेच्या भीतीने गणेशमूर्ती नदीत विसर्जित करणे, देवीच्या मूर्तींचे विसर्जन, छठपूजा, अगदी कावड यात्रेसाठी नदीतून पाणी नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्या अधिकाऱ्याने मगर पाहिली? त्याबद्दल तपशील नाही. मगरीच्या दर्शनाच्या आधारे न्यायालयाकडून विसर्जन बंदीचा काढण्यात आलेला आदेश सर्वस्वी चुकीचा असल्याचे ते म्हणाले. कावड यात्रेसाठी लोक नदीतून पाणी गोळा करायचे. आता महापालिका तिथे टँकर पार्क करून त्यात नदीचेच पाणी भरून ते पुरवते. हा हिंदू धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे जो खपवून घेतला जाणार नाही. प्रशासकीय अधिकारी केंद्र सरकारचे नियम पाळत नाहीत. आरेतील तलावाभोवती खासदार गजानन किर्तीकर यांनी लाखो रुपयांचा निधी गुंतवून तलाव विकसित केला आहे. पण आता तिथे गणपती विसर्जन तसेच बोटिंग खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात आपण सरकारला पत्र दिले असून यंदा नॅशनल पार्क आणि आरेच्या तलावात जरी विसर्जन शक्य झाले नसले तरी किमान पुढील वर्षीपासून विसर्जनाला परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी आपण सरकारकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.