“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 00:34 IST2025-04-15T00:34:15+5:302025-04-15T00:34:29+5:30
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. राऊतांनी कोकणातही उद्धवसेना संपवली, अशी टीका करण्यात आली आहे.

“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले
Shiv Sena Shinde Group News: गेल्या अनेक दिवसांपासून एकामागून एक धक्के ठाकरे गटाला बसत आहेत. उद्धव ठाकरेंसमोर पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान आहे. एकाबाजूला मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात असताना, दुसरीकडे उद्धवसेनेतील प्रवक्ते, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजना घाडी आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी ठाकरे गटाला रामराम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
संजना घाडी यांना पक्षाच्या वतीने शिवसेना शिंदे गटातील उपनेत्या आणि पक्ष प्रवक्त्या अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली. यानंतर माजी नगरसेवक संजय घाडी यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना दाऊदकडून नाही तर विनायक राऊत यांच्यापासून खरा धोका आहे. ते स्वतःतर लोकसभेला पडलेच. पण त्यांनी कोकणातही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, असे संजय घाडी यांनी म्हटले आहे. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांचा मातोश्रीवर हस्तक्षेप वाढला असून, लोक म्हणतात, त्याप्रमाणे आता त्यांनी बिछाना घेऊन मातोश्रीवर येणे बाकी आहे. राऊत यांचा पक्षसंघटनेतही हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे संघटनेचे नुकसान होत आहे, हे पक्षश्रेष्ठींनी पाहिले पाहिजे, असे संजना घाडी यांनी म्हटले आहे.
आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही
मातोश्रीवर गद्दार हा शिक्का तयार करून ठेवलेला आहे. पक्षातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला पक्षांतर्गत गद्दार बसले आहेत, त्यांचा वेळीच बंदोबस्त केला तर कदाचित ती संघटना वाचू शकेल. ठाकरे यांचा पक्ष सध्या शिवसेना नेते विनायक राऊत चालवत आहेत. विनायक राऊत हेच सध्या पक्षातील नियुक्ती करतात, तेच तिकीट वाटप करतात. राऊत हे कशा पद्धतीने पक्ष चालवतात ते बऱ्याच जणांना माहिती आहे. ठाकरे यांचा पक्ष हा हिंदूत्वापासून खूप दूर गेला असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. आपल्या प्रभागात स्पोर्टस क्लब करायचा आहे, प्रसुतीगृह अद्ययावत करायचे आहे. अशा विकासकामांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे घाडी यांनी सांगितले.
दरम्यान, घाडी यांच्याबरोबर कोणताही पदाधिकारी गेलेला नाही असा दावा ठाकरे पक्षातील मागाठाणेतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. घाडी यांना नगरसेवक पद, संजना यांना प्रवक्ते पद आणि त्यांच्या मुलाला युवासेनेचे पद देऊनही पक्ष सोडला, असा आरोप ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच मागाठाणे मतदारसंघातून आता जिंकून येण्याची खात्री नसल्यामुळे घाडी दाम्पत्याने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. शिवसेनेतून मनसेमध्ये व नंतर पुन्हा शिवसेनेत आलेले घाडी यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे कोणताही आश्चर्याचा धक्का बसला नसल्याची प्रतिक्रियाही मागाठाणेतील ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत असल्याचे समजते.