Join us

अशोक चव्हाण एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होते; माजी खासदाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 5:30 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

Ashok Chavan ( Marathi News ) :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आता चव्हाण यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया येत आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही प्रतिक्रीया दिली असून त्यांनी अशोक चव्हाण यांच्या नाराजीचे कारण सांगितले आहे. 

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करुन अशोक चव्हाण यांच्या नाराजीचे कारण सांगितले आहे. निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "अशोक चव्हाण हे पक्षासाठी निश्चितच संपत्ती होते. कोणी त्यांना उत्तरदायित्व म्हणत आहेत, कोणी ईडीला जबाबदार धरत आहेत, ही सर्व उतावीळ प्रतिक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते, याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असा गौप्यस्फोट संजय निरुपम यांनी ट्विट मध्ये केला आहे.

"अशोक चव्हाण हे कुशल संघटक, जमिनीवर पक्की पकड असलेले नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पाच दिवसांची होती, तेव्हा संपूर्ण नेतृत्वाने त्यांची क्षमता प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचे काँग्रेस सोडणे हे आमचे मोठे नुकसान आहे.त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही, असंही निरुपम यांनी म्हटले आहे. 

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीआधी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील काँग्रेसमधील मोठे नाव आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता आणखी काही आमदार बाहेर पडू शकतात अशी चर्चा सुरू आहे. 

अशोक चव्हाण काय म्हणाले?मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे, पक्षाच्या वर्किंग कमीटीचाही राजीनामा दिला आहे.  मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. मला कोणाबद्दल व्यक्तीगत काही बोलायचे नाही. या पुढची राजकीय दिशा मी दोन दिवसात निर्णय घेईन अजुनही ठरवलेले नाही, अशी प्रतिक्रीया अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 

"भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहिती नाही, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी अजुनही घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचे काम केले आहे, मला वाटतं आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. मला कोणत्याही पक्षांतराची जाहीर वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाही, मला वाटतं आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.  

टॅग्स :अशोक चव्हाणकाँग्रेसभाजपा