मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच सोमय्यांचा पत्ता कट- संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 08:29 PM2019-04-03T20:29:35+5:302019-04-03T20:29:54+5:30
काँग्रेसचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी किरीट सोमय्यांना भाजपानं उमेदवारी न दिल्यानं टीका केली आहे.
मुंबईः काँग्रेसचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी किरीट सोमय्यांना भाजपानं उमेदवारी न दिल्यानं टीका केली आहे. किरीट सोमय्यांनी वेळोवेळी मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढला. त्याचीच त्यांना शिक्षा मिळाली. भ्रष्टाचार संपवण्याचा भाजपानं जो संकल्प घेतला आहे, त्याचं पुढे काय झालं ?, असा प्रश्नही संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. भ्रष्टाचाराचे जे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते, त्यांची सीबीआय चौकशी होणार काय?, असं म्हणत निरुपम यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेने ज्यांच्या उमेदवारीला वारंवार विरोध केला होता, सोमय्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दबावाला भाजपाचे नेतृत्व बळी पडले आणि सोमय्यांसारख्या निष्ठावंताचा बळी गेला, अशी प्रतिक्रियाही राजकीयतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित घोटाळ्यांकडेही त्यांनी अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अंगुलीनिर्देश केला. विशिष्ट चौकशी यंत्रणेकडे त्याबाबतची माहिती पुरविण्यामागे सोमय्याच होते असा संशय त्यातून निर्माण झाला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामागे 'मातोश्री'चा हात असल्याचा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता. तेव्हापासून ते शिवसेनेचे लक्ष्य बनले. पण फक्त शिवसेनेचा विरोध हेच सोमय्यांचा पत्ता कापला जाण्यामागचं कारण नाही.
किरीट सोमय्या की टिकट कट गई।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 3, 2019
उसने मातोश्री का भ्रष्टाचार उजागर किया था।
इसकी सजा उसे मिली।
भ्रष्टाचार मिटाने का जो संकल्प #BJP ने लिया था,उसका क्या हुआ?
भ्रष्टाचार के जो आरोप किरीट ने लगाए थे,क्या उसकी #CBI जांच होगी?
या Mr56” ने घुटने टेक दिए हैं?
कारण, महाराष्ट्रातल्या चार मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना शिवसेनेचा विरोध होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात काय चित्र होतं, हे तर सगळ्यांनीच पाहिलं. परंतु, भाजपाने शिवसेनेची समजूत काढली आणि त्या जागांवर आपल्याला हवे तेच उमेदवार दिले. भाजपा सेनेपुढे झुकलं नाही. मग, इतर नेत्यांसाठी भाजपाने जे केलं, ते सोमय्यांच्या बाबतीत का झालं नाही, याचं आत्मपरीक्षण त्यांनीच केलेलं बरं. मतदारसंघातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनीही त्यांच्याबद्दल फारसा चांगला अभिप्राय दिला नव्हता, असंही कळतंय.