मुंबईः काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सीसीडीचे दिवंगत संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांना अनोख्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी खासदार संजय निरुपम यांनी अंधेरी लोखंडवाला येथील कॅफे कॉफी डे च्या शाखेत जाऊन कॉफी पिऊन अनोखी श्रद्धांजली दिली. यावेळेस त्यांच्या सोबत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा कॉफी पिऊन व्ही. जी सिद्धार्थ यांना श्रद्धांजली वाहिली. याबद्दल अधिक माहिती देताना संजय निरुपम म्हणाले की, कॅफे कॉफी डे चे जनक आणि ज्यांनी या देशातील कॉफीला एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवला, असे सीसीडी चे दिवंगत संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज आम्ही इथे सीसीडी मध्ये आलेलो आहोत. कॅफे कॉफी डे, एक भारतीय कंपनी, जिच्या कॉफीला भारतातील अतिशय लोकप्रिय ब्रँड बनवून व्ही. जी. सिद्धार्थ यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. अशा व्ही जी सिद्धार्थ यांना इतका त्रास देण्यात आला, की त्यांना आत्महत्या करावी लागली. कॅफे कॉफी डे हा उद्योगसमूह बंद होता कामा नये.
हा उद्योग असाच सुरू राहावा म्हणून 'CCD Should not die' या उपक्रमाअंतर्गत आम्ही सीसीडी मध्ये जाऊन कॉफी पिऊन व्ही जी सिद्धार्थ यांना श्रद्धांजली देत आहोत. कॅफे कॉफी डे हा उद्योगसमूह वाचला पाहिजे. यासाठी मी मुंबईतील आणि देशातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कॅफे कॉफी डे मध्ये जाऊन कॉफी प्यावी व या लोकप्रिय भारतीय उद्योगसमूहाला वाचवण्यास सहकार्य करावे.