संजय निरुपम यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 03:54 PM2019-04-08T15:54:26+5:302019-04-08T15:55:47+5:30
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.
मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना संजय निरुपम म्हणाले की, 24 बाय 7 मी सतत नागरिकांच्या हाकेला धाऊन येणारा कर्मठ कार्यकर्ता आहे. तर दुसरीकडे 5 वर्षे खासदार असलेला महायुतीच्या उमेदवार मतदार संघात दिसले नाही. त्यामुळे माझ्यासारखा सतत कार्यशील उमेदवार तर दुसरीकडे महायुतीचे निष्क्रिय उमेदवार येथून उभे आहेत. त्यामुळे मतदारांनी माझ्या सारख्या कर्मठ उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मी येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर येथील प्रत्येक व्यक्तीचा भाऊ त्यांचा सहकारी म्हणून पाच वर्षे त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहील, असा ठाम विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला आहे.
याचबरोबर, भाजपाच्या जाहीरनाम्यात राम मंदिर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता, निरुपम म्हणाले, निवडणूक आली की महायुतीला राम मंदिर आठवते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तर येऊ द्या, असे सांगत अयोध्येत राम मंदिर निश्चित उभारले जाईल असा विश्वास संजय निरुपम त्यांनी व्यक्त केला.