मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा ठपका ठेवत याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्ली येथील विशेष न्यायालयात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांच्यासह आठजणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे, बुधवारी याप्रकरणी संजय पांडे यांना सीबीआयच्या न्यायालयाने जामीन दिला आहे.
सीबीआयने यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संजय पांडे संचालक राहिलेल्या व त्यांच्या मालकीच्या आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला एनएसईतील सायबर सुरक्षेचे काम मिळाले होते. मात्र, सायबर सुरक्षेचे काम हे केवळ कागदोपत्री होते. या कामाच्या नावाखाली या कंपनीने राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग केले होते. तसेच हे टॅप केलेले फोन राष्ट्रीय शेअर बाजारातील वरिष्ठ व्यवस्थापनातील लोक नियमितपणे ऐकत होते. या कामासाठी संजय पांडे यांच्या कंपनीला आठ वर्षांत राष्ट्रीय शेअर बाजाराकडून साडेचार कोटी रुपये प्राप्त झाल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे.
एनएसईत डिजिटल रेकॉर्डिंग मशिन संजय पांडे यांच्या कंपनीने या कामाकरिता एक मोठे डिजिटल रेकॉर्डिंग मशीन राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आवारात लावले होते. या मशीनच्या माध्यमातून एकावेळी १२० कॉलचे रेकॉर्डिंग करणे शक्य होते. या रेकॉर्डिंगच्या टेप्सदेखील जप्त केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. याप्रकरणी सीबीआयने ७ जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्या दरम्यान संजय पांडे यांच्या घर तसेच कार्यालयावरदेखील सीबीआयने छापेमारी केली होती. तसेच या प्रकरणात ईडीनेदेखील तपास केला आहे.