Join us

Sanjay Pandey arrested: "भोगा आता कर्माची फळं..."; संजय पांडेंना ED ने अटक केल्यावर मनसे नेत्याचं रोखठोक ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:47 PM

NSE फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक

Sanjay Pandey arrested, ED: महाराष्ट्राची राजधानी आणि राजकारणाचं केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली. NSE ( National Stock Exchange ) फोन टॅपिंग प्रकरणात ईडीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) १४ जुलैला अटक केली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांना अटक केल्याने खळबळ माजली आहे. या कारवाईनंतर भाजपाकडून एक ट्वीट करण्यात आले होते. तशातच आता मनसेकडूनही एक सूचक ट्वीट करण्यात आले.

संजय पांडे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं होतं. 'Mission Completed today, म्हणजेच माझी मोहीम फत्ते झाली', असं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलं. तसेच संजय पांडे यांच्याबद्दलची या आधी केलेली अनेक ट्विट्सदेखील मोहित कंबोज यांनी रिट्विट केली. तशातच आता 'भूतपूर्व पोलीस आयुक्त संजय पांडे, भोगा आता कर्माची फळं', असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही यावर व्हिडीओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. "NSE कोलोकेशन आणि फोन टॅपिंग घोटाळ्यात मुंबईचे माफिया पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अटकेच्या कारवाईचे मी स्वागत करतो. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या 'माफियाराज'साठी पोलीस दलाचा गैरवापर केला आहे", असे ट्वीट करत त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला.

दरम्यान, ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि संजय पांडे यांच्यावर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने गुन्हा दाखल केल्यानंतर एका आठवड्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरमध्ये काय आरोप आहेत?- लाइव्ह मिंटमधील वृत्तानुसार, नुकत्याच नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांना मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या  iSEC या कंपनीचा शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे इंटरसेप्ट करण्यासाठी समावेश करण्यात आला होता. एफआयआरमध्ये असेही आरोप करण्यात आले होते की, संजय पांडे यांच्या कंपनीला स्टॉक एक्स्चेंज कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याबद्दल 4.45 कोटी रुपये देण्यात आले होते.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयमुंबईमनसेसंदीप देशपांडे