मुंबई : मुंबई उत्तर पूर्व मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारार्थ परवानगी न घेताच रॅली काढणे आमदारांना महागात पडले आहे. भांडुप पोलिसांनी आमदार रमेश कोरगावकर आणि माजी नगरसेवक उमेश माने विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. भांडुप भरारी पथक क्रमांक १ चे प्रमुख वैभव पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शुक्रवारी रात्री संजय पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा पार पडली. उमेदवारही या पदयात्रेत सहभागी झाले होते. निवडणूक कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास निवडणूक अधिकाऱ्याकडून भांडुपमध्ये सुरु असलेल्या रॅलीच्या परवानगी बाबत चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार, भरारी पथकाने केदारे चौकात धाव घेतली. तेथे संजय पाटील यांचा प्रचाररथ मिळून आला.प्रचार रथाकडे असलेल्या नवीन कसबे कडे चौकशी करताच त्यांच्याकडे प्रचार वाहनाबाबत परवानगी नसल्याचे समोर येताच तेथून त्याला जाण्यास सांगितले. पावणे नऊच्या सुमारास पथकासह पाच मंदिर येथे जात असताना पाटील यांच्या प्रचारार्थ सुरु असलेली रॅली दिसून आली. चौकशीत आमदार रमेश कोरगावकर आणि माजी नगरसेवक उमेश माने यांनी ही रॅलीचे आयोजन केल्याचे समजताच त्यांच्याकडे प्रचार रॅलीच्या परवानगीबाबत विचारणा केली. त्यांनी निवडणूक कार्यालयाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. निवडणूक कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रचार रॅली थांबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते. आमदारांनी रॅली न थांबवता नरदास नगर, वैभव चौक येथुन गावदेवी येथे रात्री साडे दहा वाजता संपवली. अखेर, प्रचार रॅलीचे परवानगी नसल्याने थांबविण्याबाबत दिलेले आदेशाला न जुमानता, आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी रविवारी आमदार, माजी नगरसेवकासह तीस ते चाळीस जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करत आहे.आमदारांनी प्रचार यात्रेचे फोटो देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
संजय पाटील यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी रॅली; आमदारासह माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
By मनीषा म्हात्रे | Published: April 28, 2024 9:12 PM