Join us

Sanjay Pawar: शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर; संजय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 5:36 PM

माझ्यासारख्या शिवसैनिकाला आनंदच होणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं.

मुंबई/कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. शिवसेना संभाजीराजे छत्रपती उमेदवारी देणार की नाही, यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 

संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. संजय पवार हे शिवसेनेचे मावळे आहेत, मावळे असतात म्हणून राजे असतात, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे संभाजीराजे छत्रपती यांना टोला लगावला. तसेच, संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीस वर्षांपासून संजय पवार शिवसेनेत सक्रिय आहेत. राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत आणि त्या निवडून येतील, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Pawar: ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय, पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वाची छाप; कोण आहेत संजय पवार, जाणून घ्या!

संजय पवार यांचं नाव निश्चित झाल्यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला. त्यावर नाव जाहीर झाल्यानंतर माझ्यासारख्या शिवसैनिकाला आनंदच होणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं. तसेच माझ्यासारख्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी न्याय दिला. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याचं, संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

दरम्यान, संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही. ते आमचे राजे आहेत. संभाजीराजे किंवा मोठे राजे काय त्यांचे छोटे चिरंजीव देखील समोर आले तरी मी त्यांच्या पाया पडतो. हे शिवसैनिकावरील संस्कार आहेत. राजेंचा माझ्याकडून असा कुठला अपमान व्हावा अशी माझी अपेक्षा नाही, असे संजय पवार यांनी सांगितले. परंतू जर उद्धव ठाकरेंनी लढ म्हटले तर मला लढावेच लागेल, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. 

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही- संभाजीराजे

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही. महाविकास आघाडीसह अन्य कोणत्या पक्षांनी माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्याला माझी काही हरकत नाही. परंतू तशा कोणत्याही घडामोडी अजून तरी दिसत नाहीत. जे पक्ष उमेदवारीस पाठिंबा देतील, त्या पक्षांना सहयोग असू शकेल. सहयोग म्हणजे सहकार्य. सहयोगी सदस्यत्व नव्हे. त्यांनी पाठिंबा दिला आहे, म्हटल्यावर सभागृहात त्या पक्षांच्या धोरणांना पाठिंबा, मतदान त्या पक्षाच्या बाजूने या गोष्टी मला मान्य असतील. परंतू थेट कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्विकारणार नाही.

टॅग्स :संजय पवारउद्धव ठाकरेशिवसेनासंभाजी राजे छत्रपती