Sanjay Rathod: भाजपाची कोंडी! उद्धव ठाकरेंशी भांडून घेतला होता ज्यांचा राजीनामा, त्या संजय राठोडांना मंत्री केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:37 AM2022-08-09T11:37:45+5:302022-08-09T12:02:29+5:30
Sanjay Rathod: यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई - शिवसेना आमदार संजय राठोड यांनी मार्च महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर, राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वाक्षरी केली व हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनीही हा राजीनामा तातडीने मंजूर केल्याने संजय राठोड यांचे मंत्रीपद गेले होते. मात्र, बंडखोरीनंतर आता राठोड यांना शिंदेगटाने मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे, भाजपाने ज्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती, ते आता फडणवीसांसोबत मंत्री असणार आहेत.
यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे, ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपची चागंलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यात गाजलं होतं. पुण्यातील वानवडी भागात इमारतीतून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने व त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं. पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. त्यासाठी राज्यभरात आंदोलनही करण्यात आले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संजय राठोड यांना अखेर पायउतार व्हावे लागले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी राठोड त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता ते नव्याने मंत्री बनले आहेत.
दरम्यान, भाजपने ज्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं होतं, ते संजय राठोड आता मंत्री म्हणून कार्यरत झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे, भाजपची कोंडी होताना दिसून येते. कारण, विरोधकांकडून आता भाजपवर टिका करण्यात येत आहे.