मुंबई - शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापनेपासून अगोदरच विस्तारासाठी उशीर झाला होता, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली होती. त्यानंतर, मंत्र्यांच्या खातेवाटपाला होत असलेल्या दिरंगाईवरुनही शिंदे सरकारवर टिका करण्यात आली. मात्र, हळु हळु शिंदे सरकार आता एक एक स्टेप पुढे जाताना दिसून येत आहे. शिंदे सरकारमधील नवनियुक्त मंत्र्याना आता बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले असून आता विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळतेय. विधिमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तसेच, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहटी ट्रीप व गद्दारी या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे सरकारकडून हळुवारपणे पुढील रणनिती आखली जात आहे. शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाईसाठी आता खंडपीठ नेमण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे, आता ही लढाई आणखी पुढे काही दिवस चालणार आहेत. त्यातच, आज नवीन मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले. त्यानुसार, मंत्री उदय सामंत यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर, वादग्रस्त ठरलेल्या मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगल्यावर स्थान मिळालं. आहे.