Sanjay Raut : 'भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात अंथरलेलं कारपेट 9.5 कोटीचं', तो नेता कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:13 PM2022-02-15T17:13:59+5:302022-02-15T17:35:16+5:30
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला
मुंबई - राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. तसेच, किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या आरोपांवरही खुलासा केला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ईडीच्या धाडींची माहिती मुलुंडमधल्या दलालाला सर्वात आधी कशी काय मिळते, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. माझ्या मुलीच्या लग्नात असलेल्या मेहंदीवाल्याकडे ईडीवाले गेले, नेलपॉलिशवाल्याकडे गेले. मी कुठं कपडे शिवले हे विचारत माझ्या मुलुंडमधील टेलरकडेही ईडीवाले गेले होते. कितना पैसा दिया, क्या क्या दिया... अशी विचारणा केली. तुम्ही आमच्या घरात शिरताय, तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जाताय, दुकानात येताय, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावेळी, एका माजी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाचं उदाहरणही त्यांनी दिलं.
भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईत मोठा सेट उभारला होता. हे मंत्रीमहोदय हे वनमंत्री होते, म्हणून तो सेट फॉरेस्ट टाईपचा उभारला होता. येथे जंगलाचा फिल यावा म्हणून या सेटमध्ये अंथरलेलं कारपेट हे 9.5 कोटी रुपयाचं होतं, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ईडीला हे दिसलं नाही का? असा सवालही राऊत यांनी विचारलं. संजय राऊत यांचा रोख थेट भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे होता. याबाबत, मुनगुंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यामध्ये, स्वत:च्या खर्चावर बोट ठेवलं जातं, तेव्हा मनुष्य अशाप्रकारे वागतो. 2 वर्षांपूर्वीची ही गोष्ट असून त्यांच्या विभागाने चौकशी करुन अहवाल दिला आहे. त्या अहवालात काहीही सिद्ध झालं नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटलं.
१९ बंगल्यात पिकनिकला जाऊ
ठाकरे कुटुंबानं अलिबागमध्ये कोरलाईत १९ बंगले बांधले आहेत. ती बेनामी संपत्ती असल्याचा दावा मुलुंडमधल्या दलालानं केला आहे. कुठे आहेत १९ बंगले? चला आपण त्या बंगल्यात आपण पिकनिकला जाऊ, असं आव्हान राऊतांनी दिलं. माझं स्पष्ट आणि थेट आव्हान आहे. आपण चार बसेस करू आणि त्या १९ बंगल्यात पिकनिकला जाऊ. तिथे ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि बंगले तिथे नसतील तर मी त्याला जोड्यानं मारेन, असं राऊत म्हणाले.
जमीन खरेदीबाबतही दिलं स्पष्टीकरण
पाटणकर यांनी कुठलिही देवस्थानची जमीन खरेदी केली नाही. पाटणकरांनी देवस्थानची जमीन कुठे विकत घेतली हे दाखवा… पाटणकर आणि देवस्थानाचा काहीही संबंध नाही. 2014 साली सलिम बिलाखियाकडून ही जमिनी घेतली, त्यानंतर एकामागे एक अशी 12 जणांनी ही जमीन खरेदी केली. त्यात, 12 व्या नंबरला पाटणकर यांनी ही जमीन खेरदी केल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच, उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्याबाबतही राऊत यांनी विधान केलं. जर, 19 बंगले असतील तर आपण तिथं पिकनीकला जाऊ, मी 2 बस करतो, आपण मिळून तेथे पिकनीकला जाऊ, असे राऊत यांनी म्हटले.