Sanjay Raut: एक ट्विट तीन लक्ष्य, गुलाबराव पाटलांचा व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांचा केसरकर, शहाजीबापूंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:12 AM2022-06-27T10:12:25+5:302022-06-27T10:13:17+5:30
Sanjay Raut: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून शिवसेनेला आव्हान देणाऱ्या आमदारांविरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत कमालीचे आक्रमक झाले आहेत. आपल्या आक्रमक लेखणी आणि भाषणांमधून ते बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहेत.
मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून शिवसेनेला आव्हान देणाऱ्या आमदारांविरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत कमालीचे आक्रमक झाले आहेत. आपल्या आक्रमक लेखणी आणि भाषणांमधून ते बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहेत. दरम्यान, आता संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ शेअर करत गुलाबराव पाटील, दीपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
या ट्विटमध्ये गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणतात की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय पाहा. दीपक केसरकर थोडा संयम पाळा. डोंगर, झाडी आणि निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना, जय महाराष्ट्र, असे राऊतांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमधील भाषणात गुलाबराव पाटील शिवसेनेमुळे आपल्याला कसे मंत्रिपद मिळाले. तळागाळातील अनेक शिवसैनिकांना आमदारकी कशी मिळाली, याचं वर्णण करताना दिसत आहेत. तसेच सायकल चोरणाऱ्या नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री केले, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते.
त्यावरून संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. या ट्विटनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, बाप बदलण्याची भाषा गुलाबराव पाटील यांनी केली होती. जवळचे असणारे सगळेच गद्दार निघाले आहेत. त्यामुळे उदय सामंत यांच्या जाण्याने आम्हाला धक्का बसलेला नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोरांना जाऊन मिळालेल्या उदय सामंत यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.