मुंबई - महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चाला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंसह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. दरम्यान, या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले आहे. या सभास्थळावर नेते स्थानापन्न होत असताना आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना मान देत केलेल्या एका कृतीची चर्चा होत असून, त्याचं कौतुक होत आहे.
मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर सभास्थानी नेते स्थानापन्न होत होते. आदित्य ठाकरेही खुर्चीवर बसले होते. मात्र तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना मंचावर बसण्यासाठी खुर्ची नव्हती. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना आग्रह करून आपल्या जागेवर बसवले आणि स्वत: उभे राहिले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांचं लक्ष वेधलं गेलं. तसेच आदित्य ठाकरेंच्या या कृतीचं कौतुक होत आहे.
दरम्यान, या सभेमध्ये संबोधित करताना राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. या मोर्चाने राज्यपालांना सत्तेतून डिसमिस केले आहे. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्यांना एक मिनिटही सत्तेत राहण्याच अधिकार नाही. हे सरकार उलथून टाकण्यासाठी दिलेला हा इशारा आहे. हा मोर्चा म्हणजे सरकार उलथून टाकण्यासाठी टाललेलं पहिलं पाऊल आहे, असे संजय राऊत म्हणाले.