Maharashtra Political Crisis: “जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते”; संजय राऊतांचा बंडखोरांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 12:08 PM2022-07-10T12:08:02+5:302022-07-10T12:08:54+5:30
Maharashtra Political Crisis: आषाढी एकादशीला बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करतानाच संजय राऊत यांनी बंडखोरांवर पुन्हा एकदा खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या आमदारांवर सातत्याने टीका होत आहे. यामध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर असून, पुन्हा एकदा बंडखोरांना अप्रत्यक्षरित्या खोचक टोला लगावण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत विठ्ठल आणि बाळासाहेबांचा फोटो ट्विट केला आहे. विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल... असे कॅप्शन देत संजय राऊत यांनी बाळासाहेब हाच आपल्यासाठी विठ्ठल असल्याचे सूचित केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर मात्र संजय राऊत यांनी बंडखोरांना खोचक टोला लगावणारे ट्विट केले आहे.
जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते
शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे गटासोबत जाऊन भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या बंडखोर खासदारांवर संजय राऊत यांनी पु्न्हा एकदा निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये एक अस्वल दिसत आहे. या अस्वलासमोर आरसा येताच ते स्वत:लाच पाहून गांगरलेले दिसत आहे. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी सद्य राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. जेव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, 'रोखठोक'मधून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले. पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती, अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली आहे.