Join us

अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 05:54 IST

सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीने त्यांची खिल्ली उडवली आहे. आम्हाला विचारले असते तरी राज यांना मदत केली असती, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते. त्यांनी ते रद्द केले. पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवे असते, तर ते आम्ही नक्कीच दिले असते. अयोध्यासह उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे. काहींना तीर्थयात्रेला जायचे असते, तेव्हा ते विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचे एक मदत कक्ष आहे. कुणाला दर्शनाला अडचणी येत असतील, तर आम्ही मदत करतो. तिथे आम्ही राजकारण बाजूला ठेवतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला. तर, भाजपने त्यांच्या बाबतीत असे करणे चुकीचे आहे. प्रत्येकवेळी भाजप राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांना वापरून घेते. त्यातला हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

तूर्तास दौऱ्याचा भोंगा बंद

राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टची नक्कल करत टीका केली आहे. ‘ तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा, यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच...’ अशी पोस्ट राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आली आहे.

‘चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!’

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा स्थगित केल्यानंतर सुरू झालेल्या तर्कवितर्कांना मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ‘तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल, असा आहे. जो नेता महाराष्ट्र हितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने निर्णय बदलेल का? विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेसंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेस